✍कामाची लाज वाटणारा तरूण
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर.
दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली.
उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांडू इच्छितो -
१) मलाला युसुफजाई? - कोण ते माहीत नाही.
२) मेक इन इंडिया हे प्रदर्शन? - काय होते, कशासाठी होते हे माहीत नाही.
३) कोणत्याही १० पुस्तकांची नावं (तुम्ही वाचलेल्या किंवा न वाचलेल्या) - सांगता आली नाहीत.
४) भारतातील एकूण राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावं? - सांगता आली नाहीत.
५) बॅँकेत डिमाण्ड ड्राफ्ट कसा काढतात? - माहीत नाही.
६) भारताचं चीनशी नेमकं भांडण आहे तरी काय? - माहीत नाही.
७) इनव्हर्टर नेमकं कसं काम करतो? - माहीत नाही.
८) आॅनलाइन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना नफा मिळतो का? किंवा कसा मिळतो? - माहीत नाही.
९) चार्टर्ड अकाउंटंटचं नेमकं काम काय असतं? - माहीत नाही.
१०) माहितीचा अधिकार म्हणजे काय? - माहीत नाही.
११) काळा पैसा म्हणजे काय? - माहीत नाही.
१२) कोणत्याही १० आजारांची नावं? - सांगता येत नाहीत.
१३) वायरलेस चार्जरमध्ये कोणतं तंत्र वापरलं आहे? - माहीत नाही.
१४) अॅण्ड्रॉइड म्हणजे काय? - माहीत नाही.
१५) जगातील सर्वात श्रीमंत अशा कोणत्याही १० व्यक्ती? - सांगता आल्या नाहीत.
हे मी जे सांगतोय ते १०० टक्के सत्य आहे, एकही शब्द खोटा नाही. यादी खूप मोठी आहे आणि आपल्या समजुतींना मोठे हादरे देणारी आहे. मग मुलं करिअरचे निर्णय घेतात तरी कसे? पालक आणि शिक्षक नेमकं करतात तरी काय? मुलं काहीही नवीन वाचत नाहीत, त्यांची भाषा शुद्ध नाही, उच्चार स्पष्ट नाहीत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट मांडता येत नाही, एखाद्या गोष्टीवर त्यांना त्यांचं मतच नाही. अशा मुलांचा टिकाव स्पर्धेत लागणार आहे का? मुलांना जगातल्या अनेक गोष्टी माहितीच नाहीत, याची माहिती पालकांना नाही. हे सगळं फार धक्कादायक आहे. निराशाजनक आहे..
आला विद्यार्थी की करा अॅप्टीट्यूड टेस्ट हा प्रकार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच अंधारात टाकणारा आहे. माझ्या परिचयातल्या एका मुलीला एका ख्यातकीर्त तज्ज्ञांनी तू टेलरिंग किंवा ब्यूटिपार्लरचा कोर्स केलेला बरा, त्यापेक्षा अधिक काही तुला झेपणार नाही असं एकदम ठासून सांगितलं. आश्चर्य म्हणजे तीच मुलगी एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये तिच्या कॉलेजात दुसरी आली. आणि असा दुर्दैवी प्रकार मोठ्या शहरांमध्ये चालत असेल, तर महाराष्ट्रातल्या निमशहरी किंवा ग्रामीण भागात तर दैनाच उडाली असेल..
अंगठ्याच्या ठशावरून करिअर गायडन्स करणाऱ्या व्यक्तींची संख्या पुण्यात चांगलीच फोफावतीय. करिअरविषयीचा निर्णय अशाप्रकारे बोटांचे ठसे पाहून सांगण्याचा उद्योग ‘अॅप्टीट्यूड टेस्टिंग’च्या नावानं काही लोक करतात, याचं दु:ख मोठं आहे. ‘जा तू इंजिनिअरिंगला’ किंवा ‘कर तू सीए’ असा एका वाक्यात संपणारा करिअर गायडन्सचा उद्योग मी अनेक ठिकाणी पाहतो, मला त्या पालकांची कीव येते. अॅप्टीट्यूड हा एक अतिशय गहन अभ्यासाचा विषय आहे. कुणीही उठावं आणि स्वत:ला करिअर गायडन्स तज्ज्ञ म्हणवून घ्यावं, इतकं ते सोपं नाही. अर्धवट माहिती, अपुरं ज्ञान, क्र ेझ आणि कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याचा मोह या गोष्टींमध्ये आजचा विद्यार्थी अडकला आहे. त्याचे पालकही याच चक्र व्यूहात अडकले आहेत. त्यांना नीट मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या मुलाचं पूर्ण करिअरच धोक्यात येतं आणि शिवाय आईवडिलांचं मोठं आर्थिक नुकसानही होतं.
अनेक करिअर काऊन्सेलर्सना स्वत:लाच आयआयटी, मेडिकल, चार्टर्ड अकाउन्टन्सी या क्षेत्रांबद्दल इतकं प्रचंड आकर्षण असतं की, ते जो येईल त्याला हेच २-३ पर्याय सुचवत असतात. समाजातली बेरोजगारी आणि सुशिक्षित तरुणांमधलं नैराश्य वाढायला याच गोष्टी कारणीभूत असतात. अनेक कोचिंग क्लासेस स्वत:चा व्यवसाय वाढावा म्हणून विद्यार्थ्यांच्या कुठल्यातरी प्रवेश परीक्षा घेऊन पालकांना वाटेल ती चकचकीत आश्वासनं द्यायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. दहावीनंतर असा चुकीचा गायडन्स घेऊन पुढचा रस्ता पकडणारा विद्यार्थी बारावीला बरोबर खड्ड्यात पडतोच. तोपर्यंत कॉलेजची फी, कोचिंग क्लासची फी, टू व्हीलर, मोबाइल फोन, लॅपटॉप, पर्सनल ट्यूशन, वह्यापुस्तकं या व अशा अनेक गोष्टींवर कमीत कमी ६-७ लाख रुपयांचा अवाढव्य खर्च करून पालकांना आधीच दरदरून घाम फुटलेला असतो. तेल गेलं, तूपही गेलं आणि शेवटी धुपाटणंसुद्धा गेलं अशी पालकांची अवस्था होते. या अवस्थेतलं गांभीर्य नीट समजून घ्यायला पाहिजे.
शिक्षण आता पूर्वीसारखं साचेबद्ध राहिलेलं नाही. ते आता खरोखरच व्यापक झालं आहे. नव्या संधी उपलब्ध होत आहेत. भविष्यातही अनेक नवी दारं उघडतीलच. लेदर प्रोसेसिंगपासून ते फूड कॉर्नर चालवण्यापर्यंत आणि सोने-चांदीवरील कारागिरीपासून ते पिठाच्या गिरणीपर्यंत जवळपास १० हजारांहून अधिक उद्योगमार्ग आणि योजना उपलब्ध असतानाही मुलंमुली नैराश्यात जातातच कशी आणि आत्महत्या करतातच कशी हा प्रश्न कुणालाच कसा काय पडत नाही? स्वत:विषयीच्या वाढलेल्या खोट्या आणि बेगडी अपेक्षा हे या समस्येचं खरं कारण आहे. अन्यथा कुणी विद्यार्थी केवळ नापास झाला म्हणून आत्महत्या करेल का? - हा साधा सरळ प्रश्न आहे.
कॉस्मेटिक्स मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, टाउनशिप मॅनेजमेंट, वॉटर हार्वेस्टिंग, अॅग्रो प्रॉडक्ट्स मॅनेजमेंट, कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये आभाळभर संधी असतानाही विद्यार्थ्यांना नैराश्य का बरं यावं? अपुरी आणि अर्धवट माहिती, चकचकीत आयुष्याची क्रेझ, चुकीचे आदर्श, चटकन भरमसाठ पॅकेजेस मिळवण्याचा हव्यास हे नैराश्येचं खरं कारण..
मी तुम्हाला एक गंमत सांगतो..
पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर पोरवाल सायकल्सच्या बाहेर काही मसाजवाले बसतात, हे मी पाहिलं होतं. मी गेलो. बेताची उंची, अंगात कॉटनचा शर्ट, काचा मारलेलं धोतर, पायात स्लीपर आणि हातात टॉवेल अशा पोशाखाची दोन-तीन माणसं बसलेली होती. जॉनी वॉकरच्या मालिश तेल मालिश गाण्यात त्याच्याकडे निदान एक लाकडी खुर्ची तरी होती, इकडे तर सगळा फुटपाथवरच कारभार. मी त्यांच्यातल्या एका मुलाला भेटलो. आंध्र प्रदेशातून हा मुलगा पुण्यात आला. सुरुवातीला मजूर, हमाल, कष्टकरी माणसांचे हातपाय रगडून द्यायचा. मग मार्केटयार्ड ते लक्ष्मीरोड अशी प्रगती झाली. जागा भाडं नाही, विजबिल नाही, कुठलीही साधनं नाहीत. एक साधी तेलाची बाटली आणि एक स्वच्छ टॉवेल. बास. भांडवल काहीही नाही. बंद दुकानाच्या पायरीवर व्यवसाय चालतो. पण, कौशल्य आहे आणि मेहनतही आहे. अतिशय मितभाषी असावं लागतं. बोलणं कमी अन् काम जास्त करावं लागतं. अर्थप्राप्ती उत्तम होते. खेळाडू, दुकानदार, व्यावसायिक, अर्धांगवायू रुग्ण अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती मालिशकरिता येतात. अगदीच नाही म्हटलं तरी रोज रात्री ९.३० ते १२.३० यावेळात बिनभांडवली ८०० ते १२०० रुपये मिळतात. साधारण मासिक अर्थप्राप्ती २५ ते ४० हजारांच्या दरम्यान होते. वर्षाकाठी साधारण पाच लाख रुपये मिळतात. काही लोकांच्या घरी जाऊन मालिश करायची असल्यास ५०० ते १००० रुपये घेतात. त्याचे साधारण वर्षाकाठी दीड ते दोन लाख रुपये मिळतात.
काय वाईट आहे? आणि काय गैर आहे?
आपण जरा कल्पना करून पाहू..
एखाद्या शहराच्या महापालिकेच्या शाळांमध्ये पहाटे ५.३० ते ८.३० योगासनं व सूर्यनमस्कार वर्ग चालतो आहे. त्या शहरातले इयत्ता बारावीनंतर योगासनं व सूर्यनमस्कार प्रशिक्षण घेतलेले महापालिकेच्या शाळांमधून शिकलेले १००० विद्यार्थी आता सूर्यनमस्कार प्रशिक्षक बनले आहेत. आर्थिक प्रगती उत्तम. सायंकाळी महापालिकेच्या शाळांच्या मैदानांवर हास्ययोग क्लब चालतो. त्या शहरातील १००० महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी हास्ययोग प्रशिक्षित असून, त्यांच्यामार्फत हे वर्ग चालवले जातात. महापालिका शाळांच्या मैदानावर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सायकल क्लब चालतात. सुरक्षित वातावरणात सायकल चालवून व्यायाम व खेळ या दोन्हीचाही आनंद शहरातले नागरिक घेत आहेत. शहरातले विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे १००० विद्यार्थी हे क्लब्ज चालवतात. त्याच शहरात महापालिकांच्या शाळांमध्ये काम करणारे ३५० समुपदेशक आहेत. हे समुपदेशक प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस प्रौढांकरिता तणावमुक्त होण्यासाठी ध्यान शिबिर घेतात. १०० शाळांमध्ये ही शिबिरे चालतात. ही शिबिरे सशुल्क आहेत, त्यामुळे महापालिकेतील समुपदेशकांना उत्तम मानधन मिळत आहे.
कल्पनेतलं हे चित्र पाहायला कसं वाटतंय? नक्कीच फार आशादायक चित्र असेल. पण अशी उद्योगव्यवसाय आयडिया कुणाला सुचते का?
या सगळ्या प्रगतीच्या संधी नाहीत का? आपल्या समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठीचा हा सर्वात जवळचा उपाय आहे. नव्या संधी शोधणं, नवे रोजगार विकसित करणं आणि त्या व्यवसायांमधील उद्योजक-व्यावसायिक तयार करणं हा मार्ग जास्त विश्वासार्ह आहे. स्वत:च्या प्रामाणिक कष्टांना चांगली फळं यायला लागली की शॉर्टकट्स मारावे लागत नाहीत. कारण, स्वत:ची प्रगती करण्याचा मार्ग चांगला स्पष्ट झालेला असतो. मराठी मुला-मुलींनी कामाची लाज वाटणं सोडून दिलं तर त्यांचं कल्याण होईल. आयुष्याचं भलं होईल. पानाच्या गादीवर बसून सिगारेटी-गुटखा-मावा विकणं, आॅनलाइन लॉटरीचे उद्योग करणं किंवा तत्सम टुकार कामं करण्यापेक्षा सेवाक्षेत्रात यावं आणि सचोटीनं मोठं व्हावं. खरंतर इच्छाशक्ती आणि मेहनतीचा कंटाळा हा मोठा दोष आहे. शिक्षण आवश्यक तर आहेच, पण ते योग्य दिशा देणारं आणि प्रगती करणारं हवं. योग्य करिअर निवडण्याकरिता करिअर काऊन्सेलिंग अपरिहार्य आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून माझं विविध विद्यार्थ्यांशी बोलणं होत होतं, चर्चा व्हायच्या. इमेल संवाद सुरू होते. अजूनही मी ईमेल्स वाचतोय, मुलांचे विचार पाहतोय. काम सुरू आहे. जवळपास १५०० विद्यार्थ्यांशी मी बोललो, त्यांच्या मनातले करिअरबद्दलचे विचार जाणून घेतले.
अनेक नकारात्मक आणि निराशाजनक धक्के बसले.
या मुला-मुलींपैकी जवळपास ८५ टक्केविद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग हेच करिअर निवडायचं ठरवलंय. पण यांच्यापैकी जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत कधीही ५५-६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले नाहीत. खोलात जाऊन पाहिलं, मग लक्षात आलं की यातले अनेकजण वारंवार नापासही झालेले आहेत. अभ्यासाचा कंटाळा आहे, इंग्रजीची भीती आहे. शाळेतही नियमित जात नाहीत. मग या विद्यार्थ्यांकडून मी आणखी माहिती मिळवली. तेव्हा लक्षात आलं की, या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगविषयी काहीच माहिती नाहीय. आणि तरीही त्यांचं स्वप्न मात्र तेच आहे. यांना इंजिनिअरिंगच्या शाखा माहीत नाहीत, जगातली सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस, विद्यापीठं माहीत नाहीत, संशोधनांविषयी माहिती नाही, शास्त्रज्ञ माहीत नाहीत, पेटंट्स वगैरे तर ऐकूनही माहीत नाहीत. इंजिनिअरिंग करून पुढे काय करायचंय, याची दिशाही माहीत नाही. पण तरीही यांना इंजिनिअरिंगच करायचंय.
एकूणच परिस्थिती कठीण आहे. आता अशा मुला-मुलींकडून ते इंजिनिअर होतील आणि भारताला तांत्रिक महासत्ता करतील अशी अपेक्षा करणं म्हणजे प्लॅस्टिकच्या वेलीला खरा भोपळा लागण्याइतकं अशक्य आहे. पण मुलं आणि त्यांचे पालक हे दोघेही मृगजळाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे, वास्तविक परिस्थितीपासून ते हजारो कोस लांब असतात. हे आपल्या देशातलं चित्र असंच राहिलं तर येत्या काही वर्षांत रस्त्यावरच्या पानवाल्यापासून ते रिक्षावाला, दूधवाला, कॅब ड्रायव्हर या सगळ्या जागी इंजिनिअरिंग पदवीधरच दिसतील. जगातल्या सगळ्यात तरुण देशाची अंतर्गत अवस्था फार दयनीय होईल.
बुद्धिमत्ता, क्षमता, संशोधक वृत्ती हे जिथं महत्त्वाचं आहे, तिथं यातलं काहीच न पाहता केवळ आंधळेपणानं आणि इतरांशी तुलना करून करिअर करायला जाणं भविष्यात अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे. गेली ७० वर्षे आपण विकसनशील देश या प्रतिमेतून बाहेर का पडलो नाही, याचं हेच कारण असण्याची दाट शक्यता आहे. काय करणार, सत्य तर नेहमीच कडवट असतं...
गर्दीत जगायचं की वेगळ्या रस्त्यानं जायचं?
काही मुलं मात्र वेगळीच असतात.वेगळा विचार करतात, नव्या वाटा त्यांना माहिती तरी असतात नाहीतर त्यांनी शोधलेल्या तरी असतात. अशा मुलांकडे पाहून मात्र त्यांचं फार कौतुक वाटतं. अशा मुलांचं प्रमाण कमी आहे हे खरं पण करिअर म्हणून त्यांना जे दिसतं, त्यांची करिअरची स्वप्न म्हणून ते जी वाट पाहतात, ते पहा. त्यांना नव्या जगात करिअर म्हणून ही कामं करायची आहेत असं काहीजण सांगतात. त्या यादीवर एक नुस्ती नजर घाला, आपल्यालाच एक वेगळीच नजर मिळते..
* इकोफ्रेंडली सिमेंट
* एक लाख तास चालणारा एलईडी बल्ब
* रस्त्यावरचा धूर आणि धूळ शोषून घेणारे अॅबसॉर्बर्स
* घाण न होणारं कापड
* बाहेरचं तापमान कंट्रोल करणारी वीट
* न झजिणारे टायर्स
* टेलिरंग प्रोग्रॅमर्स
* सोलर जनसेट्स
* भाजी ताजी ठेवणारा व्हेजिटेबल कुलर
* १०० तासांहून अधिक काळ चालणारी मोबाईल बॅटरी
* तीन मजली रस्ता
* प्रोजेक्टर टीव्ही
* देशभर फ्री कॉलिंग देणारी वायर्ड टेलिफोन यंत्रणा
* शाळांकरिता डिजिटल डेस्क
* कम्युनिकेशन व लॅपटॉप चं कॉम्बिनेशन असणारा टेलिटॉप
* मिल्क ब्लॉक्स
हे सगळं या मुलांना सुचतं तरी कुठून? या गोष्टी प्रत्येकालाच सुचणं आणि जमणं शक्यच नाही. असा विचार करणारी मुलं नक्कीच सामान्य नाहीत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा दर्जा अत्यंत उत्तम आहे. या मुलांनी शालेय स्तरावरच्या तथाकथित कोणत्याही स्पर्धापरीक्षा दिलेल्या नाहीत, ही गोष्ट अनेक मुद्यांवर विचार करायला लावणारी आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला संधी देणं आवश्यक आहे. त्यांना काही वेगळं मार्गदर्शन आवश्यक आहे. या स्वप्नांच्यामागे निश्चितच अभ्यास आहे, निरीक्षण आहे, भरपूर वाचन आहे, माहिती गोळा केलेली आहे. हे सगळं खूप सकारात्मक आहे. आता अशा मुलांना पालकांनी वेडगळ कल्पना-बोगस कल्पना असं म्हणून झटकणं मात्र चुकीचं आहे. बुद्धिमत्ता आणि क्षमता यांचा अजिबातच विचार न करता घेतलेलं शिक्षण तसं पहायला गेलं निरूपयोगीच ठरतं. कारण, ते तुम्हाला दिशाही देऊ शकत नाही आणि विचारांची श्रीमंतीही देत नाही.
जेवणाच्या ताटात केवळ समान संधी द्यायची म्हणून भाताएवढं मीठ किंवा मिठाएवढा भात कधीही वाढला जात नाही. ज्याचा त्याचा वकुब वेगळा! व्यक्तीनं तिच्या क्षमता आणि बुद्धीचा खरा उत्तम, नैतिक आणि संतुलित वापर करणं आणि तिला योग्य त्या क्षेत्रापर्यंत पोचवणं महत्वाचं आहे. बिनकष्टाचं करिअर होणार नाही आणि या जगात कुणीही नर्मदेतला गोटा नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. टक्के-टोणपे खावेच लागणार आणि गर्दीतले धक्के तर बसणारच आहेत. गर्दीतच जगायचं की, वेगळा रस्ता निवडायचा हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. स्पर्धेचं वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल तेवढे अधिक यशस्वी व्हाल...
अरे, अॅप्टीट्यूड म्हणजे काय?
सकाळचीच गोष्ट. एकाचा फोन आला.
अरे, अॅप्टीट्यूड म्हणजे काय? ते सोप्या शब्दात सांग ना जरा. मी त्याला जे सांगितलं ते शेअर करतो. छत्रपतींच्या एका शब्दावर ज्यांनी अपार मेहनत घेऊन प्रतापगड उभा केला ते मोरोपंत पिंगळे किंवा रायगडाचं काम करणारे हिरोजी इंदुलकर म्हणजे बांधकामशास्त्रातलं अॅप्टीट्यूड. बसल्या बैठकीत एकटाकी गाणं लिहीणारे गदिमा म्हणजे शब्दरचनेतलं अॅप्टीट्यूड आणि त्याला तशीच बसल्या बैठकीत चाल लावणारे बाबूजी म्हणजे सूररचनेतलं अॅप्टीट्यूड. हजारो शस्त्रक्रिया अत्यंत अचूक करणारे डॉ.नीतू मांडके म्हणजे शल्यशास्त्रातलं अॅप्टीट्यूड. मनातल्या विचारांचा आणि अंतरंगाचा वेध घ्यायला शिकवणारे तेजज्ञान फाऊंडेशनचे सरश्री म्हणजे मानसिक प्रशिक्षणातलं अॅप्टीट्यूड. एका खोलीत कंपनी सुरू करून तिला जगातल्या सर्वोत्तम आयटी कंपनीपर्यंत नेणारे नारायण मूर्ती म्हणजे तंत्रज्ञान संसाधनातलं अॅप्टीट्यूड.
तो मला म्हणाला, अरे, हे फारच अशक्य आहे. या लेव्हलला जाणं सध्याच्या काळात जवळ पास अशक्य आहे. स्पर्धा बघ ना किती वाढलीय ते..
मी त्याला उत्तर दिलं, जर तुमचं अचूक अॅप्टीट्यूड तुम्हाला समजलं असेल तर स्पर्धेचा संबंधच नाही. स्वत:ला परफेक्टली ओळखलेल्या माणसाला स्पर्धेची भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अंगभूत क्षमतेच्या जोरावर तो त्याचं स्थान निर्माण करण्यास सक्षम असतो. त्यानं कशाला घाबरायचं स्पर्धेला?
नैसर्गिक क्षमतेला पर्यायच नाहीय, असं म्हणायचंय का तुला? त्यानं विचारलं.
मीच म्हणतोय असं नाही. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात टॉपला गेलेल्या प्रत्येकानं हेच आयुष्य जगलेलं आहे. त्यांना तर अप्टीट्यूडचा जिवंत अनुभवच आहे. स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा